मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

माझ्या मराठी मातीचा - मराठी कविता (कुसुमाग्रज)

प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांची माझ्या मराठी मातीचा ही मराठी कविता.
माझ्या मराठी मातीचा - मराठी कविता (कुसुमाग्रज)
माझ्या मराठी मातीचा - मराठी कविता (कुसुमाग्रज)

माझ्या मराठी मातीचा

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात;
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर,
कधी मागायास दान;
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही;
हिच्या पुत्रांच्या बाहूंत,
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर
मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली
झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा
नका करू अवमान
हिच्या दारिद्र्‍यात आहे
भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगे जागतील,
मायदेशांतील शिळा

- कुसुमाग्रज

संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.